सुनील शेडगे (नागठाणे)
नानाची 'नाना' रूपे!
नाना म्हणजे अजब रसायन आहे.
म्हणजेच तो जितका करारी आहे,
तितकाच तो हळवाही आहे!
अलिकडंच विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवा पत्नींना मदत करण्यासाठी त्यानं अन् त्याच्या सहका-यांनी पुढाकार घेतला. त्यामुळंच नाना
'सोशल मििडया'साठी कौतुकाचा विषय बनला.
मुळात तो कुठल्या न कुठल्या कारणानं सतत चर्चेत असतोच असतो.
नानाला पाहिला, त्याला आता तीस वर्षे होत आली असतील. नागठाण्यात शिवशक्ती सहकारी पतसंस्थेच्या उदघाटनासाठी तो आला होता. कोरेगावच्या शिवाजीराव मोरे यांची ती संस्था. तिचा त्याकाळी मोठा बोलबाला होता. नागठाण्यात संस्थेची शाखा सुरू होत होती. नाना उदघाटक होता.
पांढरा शर्ट अन् ब्लू पँण्ट असा त्याचा पेहराव होता. नागठाण्याच्या ऑईल मील या प्रसिद्ध वास्तूत हा कार्यक्रम होता.
त्यावेळी तो काय बोलला हे आता आठवत नाही. त्यानं बोललेलं काही कळेल, असंही ते वय नव्हतं. मात्र त्याच्या आवाजातली धार तेव्हापासून लक्षात राहिली आहे !
खरं तर तो तेव्हा मोठा 'स्टार' होता, असंही नव्हे. हिंदीत तो अजून रूळायचा होता.
मात्र मराठीत त्याला वलय होतं. भालू, राघू मैना, माफीचा साक्षीदार यासारख्या चित्रपटांत तो चमकला होता.
त्याआधी दळवींच्या 'पुरुष' नाटकातील गुलाबरावची भूमिका त्यानं संस्मरणीय केली होती.
अशातच विधू विनोद चोप्राच्या 'परिंदा'त त्याला खलनायकाची भूमिका मिळाली. तिचं सोनं करताना नानानं राष्ट्रीय पारितोषिक पटकावलं.
अर्थात आईच्या सांगण्यावरून पुन्हा कधीच तो खलनायकी भूमिकांच्या वाटेला गेला नाही.
मात्र तिथून त्याच्या जीवनाला कलाटणी लाभली.
'प्रहार' चित्रपटाचं दिग्दर्शक त्यानं स्वतः केलं.
बेळगावातील 'मिलिटरी ट्रेनिंग'ची साहसी दृश्य स्वतः केली. नंतरही तो सतत काही न काही करतच राहिला ! नाशिकच्या नाट्यसंमेलनाचा अध्यक्षही झाला.
एकूणच,
त्याच्याविषयी काय लिहावं,
किती लिहावं अन् कसं लिहावं?
बाळासाहेब ठाकरे हे त्याचं श्रद्धास्थान.
मराठी माणूस हा त्याचा अभिमान.
सामाजिक जाणीव हा त्याचा प्राण.
शेवटी काय तर ऐसा नाना होणे नाही!
रविवार, १६ ऑगस्ट
sunilshedage@hotmail.com
No comments:
Post a Comment