Saturday, 12 March 2016

यशवंतराव चव्हाण यांची १०३ वी जयंती

1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, त्यानंतर देशाचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवलेले यशवंतराव चव्हाण हे अग्रणी राष्ट्रीय नेते होते. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाला 12 मार्च 2012 रोजी प्रारंभ झाला. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आयुष्यातील 1912 ते 1946 पर्यंतच्या कालखंडाचा आढावा घेणारे ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र लिहिले होते. त्याची पहिली आवृत्ती 7 फेब्रुवारी 1984 रोजी प्रेस्टिज प्रकाशनाने प्रसिद्ध केली होती. चव्हाणांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभाच्या निमित्ताने याच आत्मचरित्राची दुसरी आवृत्ती रोहन प्रकाशनने प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर याच आत्मचरित्राच्या गायत्री पगडी यांनी इंग्रजीत केलेल्या अनुवादाची पहिली आवृत्तीही रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. त्या पुस्तकाचे नावही ‘कृष्णाकाठ’ असेच आहे.
यशवंतराव चव्हाणांचे जन्मगाव असलेले देवराष्ट्र हे सातारा जिल्ह्याच्या एका टोकाशी वसलेले आहे. त्या गावच्या रम्य आठवणींपासून या आत्मचरित्राला प्रारंभ झाला आहे. सार्वजनिक आयुष्यात यशवंतराव चव्हाण कसे घडत गेले याची देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधीपर्यंतची कहाणी या आत्मचरित्रात आलेली आहे. मात्र त्यांनी या पुस्तकात आपल्या जन्मतारखेबद्दल लिहिलेला तपशील काहीसा गमतीदार आहे. यशवंतराव चव्हाण म्हणतात : देवराष्ट्र या गावी माझा जन्म 1913 च्या 12 मार्च रोजी झाला. शाळेचे सर्टिफिकेट एवढाच त्याचा पुरावा आहे. मी माझ्या आईचे पाचवे किंवा सहावे अपत्य असल्यामुळे माझ्या जन्मतारखेची नोंद कोणी ठेवण्याची काळजी घेतली नाही. त्या काळी त्यांना अशा गोष्टीची जरुरीही वाटत नसावी. माझा जन्म म्हणजे काही महत्त्वाचा सुवर्णक्षण आहे अशी काही परिस्थिती नव्हती. आज मला अनेक मंडळी ‘तुमची निश्चित जन्मतारीख सांगा’ असे म्हणतात, तेव्हा त्यांना मी हीच तारीख सांगतो व हीच तारीख माझा जन्मदिवस म्हणून पाळतो आहे...
1927 साल किंवा त्यापूर्वीचे साल असेल. मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून भास्करराव जाधव हे सातारा जिल्ह्यातून उभे राहिले होते. बहुजन समाजाचा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी त्या काळी मतदारांमध्ये जी लगबग होती ती या काळात यशवंतराव चव्हाणांना पाहायला मिळाली. सत्यशोधक विचारसरणीचा आग्रहाने पुरस्कार करणा-या केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर यांची एक सभा याच वेळी कराडमध्ये झाली. या सभेमुळे यशवंतरावांच्या मनात ब्राह्मण व ब्राह्मणेतर वादासंदर्भात काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले. त्याचे निराकरण त्यांनी आपले वडीलबंधू गणपतराव यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न केला. खूप विचार करून ब्राह्मणेतर चळवळीच्या संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडले पाहिजे, हे त्यानंतरच त्यांच्या मनाने घेतले. यशवंतराव चव्हाण हे कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये असताना त्यांची वाचनाची गोडी अधिक वाढली, तसेच सामाजिक कार्याबद्दल असलेली समज आणखी वाढली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामामध्येही अनेक घडामोडी घडत होत्या. यशवंतराव चव्हाण ज्या वेळी शालेय व नंतर महाविद्यालयीन विद्यार्थी होते तो काळ हा लोकमान्य टिळकांचे युग संपून महात्मा गांधी यांच्या राजकारणाने सारा देश प्रभावित झालेला होता. 1929 सालच्या अखेरीस यशवंतराव चव्हाण काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट होऊ लागलेले होते. दरम्यानच्या काळात ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसह काही रॉयवादी विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात आले व प्रभावितही झाले. मात्र यशवंतरावांचा मुख्यत: ओढा हा महात्मा गांधी व पं. नेहरू यांच्या विचारसरणीकडेच होता. पुढच्या काही वर्षांत मानवेंद्रनाथ रॉय यांचे काँग्रेसशी असलेले वैचारिक मतभेद टोकाला गेले. त्या वळणावर आपण काँग्रेसबरोबरच राहायचे हा निर्णय यशवंतराव चव्हाण यांनी मनाशी ठामपणे घेतला.
कराड व सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी व सभांच्या बातम्या पाठवण्याचे काम यशवंतराव याच काळात स्वयंप्रेरणेने करत असत. पुण्याच्या ‘ज्ञानप्रकाश’ या वृत्तपत्रात एक बातमीदार या नावाने त्यांनी पाठवलेल्या बातम्या प्रसिद्ध होत असत. पुढे कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी व्यतीत केलेली चार वर्षे ही यशवंतराव चव्हाणांचे वाचन, राजकीय आकलन वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील एक अग्रगण्य काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख याच काळात पक्की झाली. निवडणुकांमध्ये कोणत्या प्रकारची समीकरणे यशस्वीपणे हाताळावी लागतात याचे उत्तम भानही त्यांना याच काळात आले. 1933 मध्ये कारावास भोगून बाहेर पडताना यशवंतराव चव्हाण हे फक्त काँग्रेस कार्यकर्ते राहिले नव्हते, तर त्यांच्या विचारांना समाजवादी निष्ठेचीही जोड मिळाली होती. त्या दिशेने पुढे काही काळ त्यांचे राजकारण गेले. 1946 मधील मार्च महिन्यामध्ये मुंबई विधिमंडळासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडून गेले. त्या वेळचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी यशवंतराव चव्हाण यांची नेमणूक पार्लमेंट सेक्रेटरी म्हणून केली. हा इथवरचा राजकीय प्रवास यशवंतराव चव्हाण यांनी ‘कृष्णाकाठ’मध्ये मांडलेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द जशी बहरली, तशी त्यामध्ये अनेक वादळेही आली ,यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला त्यांच्या १०३ व्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन .

No comments:

Post a Comment