शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र मनोमनी या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती.
या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला.
सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार केला.
आज या समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के इतके विक्रमी आहे. आज ५० वर्षांनंतर अॅड. शंकरराव खरात, डॉ. भालचंद मुणगेकर आणि डॉ. नरेंद जाधव हे महाराष्ट्रातल्या नामवंत पुणे, मुंबई, औरंगाबाद या विद्यापीठांचे कुलगुरू झाले.
युनिव्हसिर्टी गँट कमिशनचे आजचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात सार्या देशातल्या उच्च शिक्षणाची धुरा सांभाळीत आहेत;
तर डॉ. भालचंद मुणगेकर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य आहेत.
डॉ. नरेंद जाधव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते रिर्झव्ह बँकेचे सल्लागार होते.
शेकडो लोक पीएच.डी. झालेले आहेत. हजारो लोक डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, आकिर्टेक्ट आहेत. हजारो लोक प्राध्यापक आहेत आणि प्राथमिक- माध्यमिक शिक्षकांचा तर सुळसुळाटच आहे.
समाजाचे क्रीम समजल्या जाणार्या आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकार्यांमध्ये डझनाने अधिकारी या आंबेडकरी समाजातले आहेत.
अभिमान वाटावा असा मध्यमवर्ग, उच्चमध्यम वर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आहे. वेश, भूषा, भवन, भाषा सारे बदलून गेले आहे. आज ‘वाडावो माय भाकर येस्कराला’ हे इतिहासजमा झाले आहे.
आय.ए.एस., आय.पी.एस., यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी.या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये देशात एक नंबरला ब्राह्मण आहेत आणि दोन नंबरला पूर्वीचे महार आणि आताचे बौद्ध आहेत.
विद्वत्तेच्या सर्व क्षेत्रांमध्ये या दोन समाजांचीच स्पर्धा सुरू आहे.
सर्वाधिक ब्राह्मण मुलींनी पूर्वास्पृश्य असलेल्या या समाजातील तरुणांशीच आंतरजातीय विवाह केल्याचे दिसेल. रोटी-व्यवहाराची तर क्रांती झालीच पण बेटी-व्यवहाराची क्रांती या समाजात घडते आहे. बेटी-व्यवहार आपल्या बरोबरीच्या माणसांशी होतो.
साहित्याच्या क्षेत्रातही दलित साहित्याने आपला स्वतंत्र इतिहास निर्माण केला आहे. दलित कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, निबंध, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनादि क्षेत्रांतील कार्याने भल्याभल्या सरस्वतीपुत्र
म्हणवणार्यांना तोंडात बोटे घालायला लावले आहे.
केवळ लिहिलेच नाही, तर आपला वाचकवर्गही त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत.
दलित साहित्य आणि दलित जाणीव, दलित चळवळ आणि अलीकडे आंबेडकरी चळवळ ही देशातल्या अन्य कोणत्याही प्रांतात निर्माण होऊ शकली नाही.
ती महाराष्ट्रातच निर्माण झाली; याचे कारण स्वत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि अस्मिता यांची पेरणी ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या आंबेडकरी भूमीतच देशातले पहिले साहित्यातले बंड मराठीमध्ये झाले.
लोक विनोदाने म्हणतात, ‘ब्राह्माणांनी मटण महाग केले आणि दलितांनी पुस्तके महाग केली’ ब्राह्मणाघरी लिवणं, कुणब्याघरी दाणं आणि महाराघरी गाणं हे आंबेडकरवाद्यांनी खोडून टाकले. आता दलिताघरी लिवणं आणि बामणाघरी गाणं असे नवे सूत्र मांडायला हरकत नाही.
दीक्षाभूमीवर लागणारी पुस्तकांची दुकाने, गावोगाव भरणारी साहित्य संमेलने आणि त्या प्रत्येक साहित्य संमेलनाच्या बाहेर थाटलेली पुस्तकाची दुकाने, सीडी, कॅसेट्स यांची लागणारी दुकाने हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे.
तीर्थक्षेत्रावर हार, तुरे, माळा, नारळ, कुंकू, बुक्के, शेले, दुपट्टे, चादरींची रेलचेल असते. पण तिथे दीक्षाभूमीवर नानाप्रकारच्या हजारो ग्रंथांची झालेली गर्दी दिसते.
हिंदू तीर्थक्षेत्रावरून हिंदू बंधू पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बंधू हज यात्रेवरून ‘आब-ए-जमजम’ आणतात, आमचे बौद्ध बंधू मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन जातात.
ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने. ही ज्ञानाकांक्षा हेच धम्माचे सार्मथ्य आहे.
खेडी सोडून शहराकडे चला, हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. अंधार युगातील अंध:कार कूप ठरण्याची भीती ओळखून बाबासाहेबांनी खेड्याला केंदबिंदू न ठरवता व्यक्तीला विकासाचा केंदबिंदू ठरवले होते. डॉ. भाऊ लोखंडे यांनी त्यांच्या एका लेखामध्ये फार छानपणे बाबासाहेबांचा खेड्यासंबंधीचा विचार मांडला आहे.
पॅसिफीक रिलेशन्स परिषदेला सादर केलेल्या प्रबंधात बाबासाहेब म्हणतात
अ). जोपर्यंत अस्पृश्य लोक हे खेड्या च्या बाहेर रहातात, त्यांना उदरनिर्वाहाचे साधन नाही, त्यांची लोकसंख्या हिंदूंच्या मानाने कमी आहे, तोपर्यंत ते अस्पृश्यच रहाणार. हिंदूंचा जुलूम व जाच चालूच रहाणार व स्वतंत्र, संपूर्ण जीवन जगण्याला ते असमर्थच रहाणार.
ब). स्वराज्य म्हणजे हिंदू राज्यच होईल. त्यावेळी स्पृश्य हिंदूंकडून होणारा जुलूम व जाच अधिकच तीव्र होईल. त्यापासून दलितवर्गाचे चांगल्या रीतीने संरक्षण व्हावे.
क). दलितवर्गातील मानवाचा पूर्ण विकास व्हावा. त्यांना आथिर्क व सामाजिक संरक्षण मिळावे, अस्पृश्यतेचे उच्चाटन व्हावे म्हणून या परिषदेचे पूर्ण विचारांती असे ठाम मत झाले आहे की, भारतात प्रचलित असलेल्या ग्रामपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला पाहिजे.
कारण गेली कित्येक वर्षे स्पृश्य हिंदूंकडून दलितवर्गाला सोसाव्या लागणार्या दु:खाला ही ग्रामपद्धतीच कारणीभूत झालेली आहे. खेड्यातील दलित बांधवांची अवस्था आठवून बाबासाहेब ढसढसा रडत असत. ते म्हणत असत, खेडापाड्यातून रहाणार्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा उद्देश सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले माझे सार्मथ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे.
जोपर्यंत ते खेडी सोडून शहरात रहायला येणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जीवनस्थितीत सुधारणा होणार नाही. खेड्यात रहाणार्या या आमच्या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी रहाण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते, तेथे आपली भाकरी आहे. परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे.
ज्या गावी कुत्र्यासारखे वागविले जाते, ज्या ठिकाणी पदोपदी मानभंग होतो, जेथे अपमानाचे स्वाभिमानशून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे? खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडिक जमीन असेल ती ताब्यात घ्यावी आणि नवनवीन गावे वसवून स्वाभिमानपूर्ण माणूसपणाचे जीवन जगावे. तेथे नव-समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कुणी अस्पृश्य म्हणून वागविणार नाही.
गेल्या ५० वर्षांत दोन जातींनी खेडी सोडली. एक बौद्ध व दुसरे ब्राह्मण. दोघे शहरांमध्ये येऊन राहिले. पूर्वास्पृश्य असलेल्या दलितांना शेतीच्या उत्पादनव्यवस्थेत काही स्थान नव्हते. तर ब्राह्माण कुळ कायद्यामुळे व ४८च्या गांधी हत्येनंतर खेड्यांमधून शहरांकडे धावले.
जातींची बहुसंख्या आणि जातींची अल्पसंख्या ही परिस्थिती भयावह आहे. घटनेमध्ये एक माणूस, एक मूल्य हा सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला असला, तो घटनेने स्वीकारला असला, घटनेने स्वातंत्र्य-बंधुता-न्याय ही तत्त्वे स्वीकारली असली, तरी वास्तवामध्ये हिंदू नावाची काही गोष्टच नसते. तेथे जाती असतात आणि जातीच राजकारणाचे रूप घेऊन अल्पसंख्य, बहुसंख्य ठरवित असतात. त्यामुळे जातीने अल्पसंख्य व जातीने बहुसंख्य हेच सूत्र सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या फेरवाटपात महत्त्वाचे ठरते आहे.
या स्थितीचा अल्पसंख्य जातींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मला वाटते. या देशात जात बदलताच येत नाही असे रोज सांगितले जाते. परंतु आधीच्या बौद्धांनी हे सिद्ध केले आहे की जात बदलता येते; तिचे वास्तवही बदलता येते.
आता ज्यांनी धर्म बदलला नाही, त्यांची काय परिस्थिती आहे?
महाराष्ट्रातल्या अस्पृश्यांमध्ये एक नंबरला पूवीर्चे महार होते; तर दोन नंबरची लोकसंख्या पूर्वीच्या मांगांची आहे. आता अस्पृश्य कुणीही राहिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यात अस्पृश्यता नष्ट केली आहे. या दोघांशिवाय बाकी छोट्या छोट्या अस्पृश्य जाती आहेत; ज्या आजही गावगाड्यात आहेत. त्यांची परिस्थीती काय आहे? त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण काय आहे? मातंग समाजात एखाद-दुसरा अपवाद सोडला तर कुणीही आय.एस.आय. अधिकारी नाही. अपवादानेच एखाद-दुसरा आय.पी.एस. अधिकारी असेल. तीच परिस्थिती बाकीच्या स्पर्धापरीक्षांची आहे.
ज्या ठिकाणी पूर्वीच्या महारांनी गावगाडा सोडला, गावाची सेवा-चाकरी सोडली, ती सारी कामे ही मातंगांच्यावर लादली गेली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यामुळे एक-दोन टक्के तरी शिक्षण असेल की नाही, याची चिंता केली पाहिजे.
सबंध मातंग, चर्मकार, ढोर या सगळ्यांच्या शिक्षणाचा व त्यांना ५० वर्षांत काय मिळाले याचा स्वतंत्र अभ्यास होण्याची गरज आहे. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनीअर, कलेक्टर, कमिशनर, प्रशासन यंत्रणांमध्ये या समाजाचं काय प्रमाण आहे, याचाही तपशीलवार अभ्यास होण्याची गरज आहे.
आज अन्याय, अत्याचार सर्वाधिक होत आहेत ते मातंगांवर सर्व गावगाड्यांतल्या कामाचं स्वरूप उदा. डफडे वाजवणे एवढी गोष्ट लक्षात घेतली तरी काय जाणवते? डफडे वाजविण्याचा पारंपरिक धंदा हा मातंगांच्या गळ्यात मारला आहे. मातंग समाज स्वत:ला हिंदू धर्मीय समजतो.
त्यांनी हिंदूंच्या सण, उत्सव, लग्नात डफडे वाजविलेच पाहिजे. नाहीतर त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो. त्याने डफडे वाजवले तरीही आणि नाही डफडे वाजवले तरीही त्याला काही मारुतीच्या मंदिरात पाया पडायला जाता येत नाही. आणि गेला तर मार बसतोच. वरात घोड्यावरून काढल्यास, चांगले कपडे घातल्यास, चांगले रहाणीमान केल्यास, शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास, सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरल्यास, सवर्णांची लहानमोठी कामे न केल्यास जनावरांसारखा मार खावाच लागतो.
अगदी अलीकडेच, म्हणजे या महिन्या-दोन महिन्यांतक औरंगाबाद जिल्ह्यातील साकेगाव येथील सुनील आव्हाड याने पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्यामुळे गावातील जातीयवादी गावगुंडानी त्याला जातीवाचक शिवीगाळ करून वेशीवर बांधून बेदम मारहाण केली. त्याच्या घरावर हल्ला करून कुडाची भिंत तोडली. त्याचा लहान भाऊ, वडील यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारले.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कोतळी गाव येथील भारतीय जनता पक्षाचे विधानसभा गटनेते एकनाथ खडसे यांच्या मुलाने, पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्याने नीना अढायके या मातंग तरुणास बेदम मारले. त्याचा मुलगा व पत्नी यांनाही मारले. या दोन्ही घटनांमध्ये अन्याय करणारे पोलिस पाटील, सरपंच तसेच इतर अनेक लोक आहेत. या अगदी अलीकडच्या घटना आहेत. रोज कुठेना कुठे अशा घटना घडतच असतात. सर्वांची नोंद होतेच असेही नाही. डफडे वाजवायचे की वाजवायचे नाही, हा त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण असे स्वातंत्र्य मातंगांना आहे काय?
सोलापूर जिल्ह्यातल्या चर्मकार समाजातल्या भगिनीवर पाच सहा महिन्यांपूर्वी अतिप्रसंग झाला. काय तिने कोणाचे घोडे मारले होते? ती हिंदू आहे, अस्पृश्य आहे आणि ती पाटील सांगेल त्या गोष्टीला हो म्हणत नाही. मग दुसरे काय होणार? जोवर हे सारे दलित हिंदू राहतील, तोपर्यंत त्यांच्यावर असाच अन्याय होत राहील.
तीच परिस्थिती भटक्या विमुक्तांची. दलितांचा बहिष्कृत भारत; आमचा तर उद्ध्वस्त भारत. आमच्या तर मनुष्यत्वालाच अर्थ नाही. स्वातंत्र्याला ६० वर्षे झाली; पण आमच्या शिक्षणाचे प्रमाण ०.०६ टक्के आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या कोणत्याही सुविधांचा आम्हांला स्पर्श झालेला नाही.
एका जागेला हा समाज तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस रहातच नाही. त्यामुळे मतांच्या राजकारणात यांना कुणी विचारत नाही. अल्पसंख्य असणे हा यांचा गुन्हा आहे. जोवर ती माणसे लमाण, कैकाडी, माकडवाला, वडार रहातील तोपर्यंत लोकशाही पर्यंत पोहचूच शकत नाही.
लोकशाहीमध्ये त्यांचा प्रतिनिधी नसेल तर ६० वर्षांत काय स्थिती झाली आपण पहातोच आहोत. त्यामुळे जाती नष्ट करायला पर्याय नाही. ज्यांनी जात नष्ट केली, ते पुढे गेले.
ते बौद्ध असोत, मुस्लिम असोत, ख्रिश्चन असोत. आणि ज्यांनी जात सोडली नाही, जातीची मानसिकता सोडली नाही, वर्णव्यवस्थेची गुलामगिरी सोडली नाही ते वेगाने मागे पडतायत. मग ते मराठे असोत, माळी असोत, कुणबी असोत. ब्राह्मणेतरांमध्ये सर्व गरीब गट वेगाने मागे जात आहेत.
या सगळ्यांचा गांभीर्यपूर्वक विचार केल्यानंतरच मी आणि माझ्या सहकार्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग स्वीकारलेला आहे.
सवलती मिळोत किंवा न मिळोत; आम्हाला आमच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे. कारण जे पायावर उभे राहिले तेच पुढे गेलेले आहेत.
लाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर म्हणून जगणे आणि अस्मितेच्या शोधात निघणे हे मला अत्यंत गरजेचे वाटते. written by मा. लक्ष्मण माने
No comments:
Post a Comment